कोणी

चित्तरंजन भट - ⏱ १ मिनिट

काळजाला पिसू नये कोणी
कुशल इतके पुसू नये कोणी

जीव घ्यावा खुशाल प्रेमाने
बोचकारू, डसू नये कोणी

कुंतलांशी असे न खेळावे
मग स्वत:शी हसू नये कोणी

ओठ नाजुक बरे, न दुमडावे
वर अबोला कसू नये कोणी

दे जरा मोकळीक अर्थाला
शब्द इतके कसू नये कोणी !

कोण समजूत घालणार अता?
(एवढेही रुसू नये कोणी)

सूर्य पाण्यामधे पहावा पण
काजव्यांना फसू नये कोणी

ओळखीचे असून गाव कसे
ओळखीचे दिसू नये कोणी?

मी नसावे तुझ्यासवे जेव्हा
मी असावे, असू नये कोणी

गझल