कुणाशी बोलता आहात याची कल्पना आहे?

बेफिकीर - ⏱ १ मिनिट

'शहाणा होउनी मरशील ही संभावना आहे'
कुणाशी बोलता आहात याची कल्पना आहे?

तुझ्याशी त्याच निष्ठेने पती वागायचा नाही
तुझे आजन्म पातिव्रत्य ही वारांगना आहे

पुरे आयुष्य काढावे तरी माहीत नाही की
जगाशी सामना नाही स्वतःशी सामना आहे

तुलाही शेवटी तिरक्या कटाक्षांची सवय जडली
मला वाटायचे माझीच सारी वल्गना आहे

इथे मी बोलण्याआधीच अग्नीही दिला त्यांनी
मला न्या रे स्माशानातून थोडी चेतना आहे

मुळी बोलू नये काही तुझ्याशी रोज बोलावे
अशीही कामना आहे तशीही कामना आहे

'सुधारावे अता आपण' अशी नक्कीच आहे पण
'पुढे केव्हातरी पाहू' अशी ती योजना आहे

बघा माझ्याकडे आता, अता माझे खरे नाही
अता माझ्या विचारांना निराळी चालना आहे

कधी नुसते कुशीमध्येच डोळा लागता कळते
खरे ते प्रेम आहे नाव ज्याचे वासना आहे

तशी सांगायला नाहीत दु:खे आज काहीही
तरी ऐकायला नाहीस तू ही वेदना आहे

कुणाच्या दर्शनासाठी कधी रांगेत नसतो मी
मला अस्तित्व आहे हीच माझी प्रार्थना आहे

जशी या जीवनाशी होत हस्तांदोलने माझी
तुलाही ताठ मानेनेच मृत्यो वंदना आहे

तसा मी एरवी सामान्य लोकांसारखा असतो
तरीही 'बेफिकिर' होतो जिथे संवेदना आहे

गझल