कुर्निसात

केदार पाटणकर - ⏱ १ मिनिट

सर्व रसिकांना कळविण्यास अत्यंत आनंद होतो की, माझी खालील 'कुर्निसात' ही गझल पुढील वर्षी अमेरिकेत होणा-या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनातील सादरीकरणासाठी निवडण्यात आलेली आहे.
गझल मी स्वतः पेश करणार नसून तेथील स्थानिक कलाकार या रचनेचे सादरीकरण करतील.

आपल्या सर्वांच्याच शुभेच्छा या घटनेमागे होत्या, हा मला विश्वास आहे.
लोभ आहेच, तो कायम ठेवावा ही विनंती.

'तुला विचारू', असे कधीचे मनात होते
(कुठे निराळे तुझ्या तरी वागण्यात होते?)

हळूच माझ्याकडे तुझे पाहणे तसे ते
कसे कळावे तुला, कसे काळजात होते !

म्हणायचे जे तुला, मला ते कळून गेले
जरी निराळेच शब्द त्या बोलण्यात होते

तुझ्या विचारात मी गडे एवढा हरवतो
कळे न, केव्हा सकाळ होते नि रात होते

फुले तुला पाहताच लवली, मिटून गेली
तुझ्याच रंगास ते जणू कुर्निसात होते

मला तुझे स्वप्न ज्या क्षणी सापडून गेले...
हजार हसरे, प्रसन्न तारे नभात होते

सुगंध दोन्हीकडे,जराशी छटा निराळी
गुलाब होते इथे, तिथे पारिजात होते

-केदार पाटणकर

गझल