फितुर बोले पापणी डोळ्यास शाकारू कुठे?
पावसा वाचू कसा मी, गाल कौलारू कुठे?
झाडताना बाग माळी फेकतो पाने जुनी
या जुन्या प्रेमातल्या खाणाखुणा सारू कुठे?
हा इथे आलो कुठे ही जाग का आली मला?
मी पुन्हा झोपू कुठे अन स्वप्न साकारू कुठे?
काळ गल्ल्यातून बोळातून नेई जन्म हा
मी विचारत राहतो की सांग ना हारू कुठे?
भागवू ताकावरी मी बिंबवी माझ्यावरी
पण तरीही बोच राही, ती कुठे, दारू कुठे?
संत कोणी भेटला तर एवढे पुसणार मी
हात मी मारू कुठे अन लाच मी चारू कुठे?
वाट थोडी पाहुनी फुकटात विकले मी मला
मुल्य यावे एवढा होतोच बाजारू कुठे?
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा