कुठून जायचे पुढे

अजय अनंत जोशी - ⏱ १ मिनिट

मला अशाच निश्चयाकडून जायचे पुढे
इथे-तिथे, कुठेतरी उरून जायचे पुढे

उगाच राहिल्या व्यथा, उगाच वंचना उरी !
कधीतरी तुझ्यातुनी सुटून जायचे पुढे ..!

मला दुरून पाहता सुखात दु:ख थांबले..
लगेच आत कोंडले... चुकून जायचे पुढे !

सभोवती असूर अन् असेल ईश आत पण...
जिवास ही विवंचना.. कुठून जायचे पुढे ?

जसा प्रवास वाहिला, विदीर्ण सूर्य जाहला
मिळे विदग्ध सावली नि ऊन जायचे पुढे !

निरोप हा तुझा असे, 'निरोप घ्यायचा तुझा'...
कशास त्रास घेतला? निघून जायचे पुढे ..!

गझल