कवडसे

मधुघट - ⏱ १ मिनिट

फक्त येती गर्जना काळ्या ढगांतुन
थेंब पाण्याचा मिळे मग आसवांतुन!

'तोडुनी टाकीन साखळदंड सारे'..
चमकतो विश्वास त्याच्या पावलांतुन!

हेच सांगे संसदेतिल गल्बला, की..
माणसे झालीत पैदा माकडांतुन!

लंगडी असली जरी पायात एका,
गाय तर ठरते शहाणी वासरांतुन!

कोणत्या झाडाकडे मागू निवारा?
ठिबकती येथे कवडसे सावल्यांतुन!

गझल