कवी नावाची शिवी

भूषण कटककर - ⏱ १ मिनिट

साध्याच माणसाची साधीसुधी कहाणी
गझलेत सावकारी, दुर्मीळ चायपाणी


या टेकड्या, कडे हे, अंधार आणि खड्डे
फिरतो मनात माझ्या होऊन मी लमाणी


होण्यास संत,  साधे,  प्रेमामधे पडावे
ती बेवफा निघावी, येईल संतवाणी


मदिरा खराब आहे, आम्हास सांगती जे
आली नि संपलीही त्यांची किती घराणी


गझलेत मावणारा ना शब्द लाभला की
सोपा उपाय आहे कर 'आणि' ला तू 'आणी'


नमकीन स्वाद होता ओठामधे प्रियेच्या
आश्चर्य काय, खारे, डोळ्यामधील पाणी


ही वेदना मनाची का गप्प गप्प आहे?
आली वयात, बहुधा झालीय ती शहाणी


संबंध तोडताना खाली तिने बघावे
भासे अदा, म्हणालो, लाजू नकोस राणी


वाटो शिवी 'कवी' ही, आम्हास चालते ती
आम्ही तिचे दिवाणे, ती आमची दिवाणी


 


 


 


 




 

गझल