खेळ

गणेशप्रसाद - ⏱ १ मिनिट


शुद्ध रक्ताचा सडा हा, काल हा ताजाच होता
कापला जो काल मी, तोही गळा माझाच होता

बंदुकांपासून सार्‍या, वाचलो प्राणांसवे मी
शेवटी ज्याने दिला मज फास, तो आजाच होता

मी कशाला पाहुनी भुललो, मला कळलेच नाही
हेमगर्भा देवेतेचा, चेहरा साधाच होता

देश गेला वेष गेला, सोलली गेली त्वचाही
मी जिथे गेलो, तिथेही नागडा राजाच होता

मी कुणाला दोष देऊ, सांडल्या सार्‍या क्षणांचा
शाप देता हात, तो तर भाग्य देणाराच होता

श्वास झाले शांत, विझले नेत्र - आता दीर्घ निद्रा
हे दिले हे घेतले, हा खेळही त्याचाच होता



गझल