खरेच राणी... कधीपासुनी गझल एकही सुचली नाही
मनातली ही माझी घुसमट तुला अजुनही कळली नाही
किती खुणावू तुला खुणेने... कुठली ही तुज खुण कळेना
किलकिलत्या पापण्यात तुझिया अजुन चांदणी हसली नाही
क्षणभरही मी, तुझ्या आठवांना या... दूर न करतो केव्हा
तुझी आठवण हलके-हलके फुलली पण... मोहरली नाही
अताशा कुठे... स्वप्नामध्ये... वावरण्या तू येते माझ्या
अजुन पुरेशी गडद निशाणी... स्वप्नांनी उमटवली नाही
पत्रातुनही तुझे हासणे... हलक्याने मी टिपून घेतो
समजुन घेतो ती भाषा, जी स्वप्नांनाच समजली नाही
एकसारखे दोघांनाही... परस्परांचे... भासच होती
खरेच राणी... किती दिसांपुन भेट आपली घडली नाही
- जनार्दन केशव म्हात्रे
२/ खलिफा निवास, गांधी नगर, जुना बेलापूर रोड,
कळवा-ठाणे ४००६०५. भ्रमणध्वनी: ९३२३५५५६८८
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा