खूप झाले, हे व्यथांना रोजचे....

जनार्दन केशव म्हात्रे - ⏱ १ मिनिट

खूप झाले, हे व्यथांना रोजचे समजून घेणे
थांबवा, आता तरी हे पापण्या भिजवून घेणे

हे सुखाचे चांदणे का माझिया दारात आले?
बोललो दु:खास, आता मन जरा रिझवून घेणे

सरळ वाटेवर अचानक वळण हे मार्गात आले
कठिण आहे... मी मनाची पावले बदलून घेणे

खूप काही ठरवुनी मी आखलेला मार्ग माझा
रुचत नाही मारुनी मन मी दिशा बदलून घेणे

भेट आहे प्राक्तनाची, की असावे भोग सारे
कळत नाही या मनाला, नेमके पटवून घेणे

वाचुनी पंचांग माझे, मी म्हणालो अंबराला...
ग्रहदशा तर ठीक आहे, घर जरा बदलून घेणे

उलगडत गेले मनाचे, सर्व सापेक्षी बहाणे
अर्थ भासांचे, न जमले नेमके ठरवून घेणे

मी तुझ्या या अभिनयाची कोणती लावू मिमांसा
हासुनी जमते तुला ही... वेदना कवळून घेणे

- जनार्दन केशव म्हात्रे
खलिफा निवास, गांधी नगर, जुना बेलापूर रोड, कळवा-ठाणे ४००६०५, भ्रमणध्वनी : ९३२३५५५६८८

गझल