...लाभले

अनिल रत्नाकर - ⏱ १ मिनिट

गोड शब्दांचीच रोपे लावणारे लाभले
कौतुकाने काळजाला टोचणारे लाभले

शालजोडीतून करिती वार ते माझ्यावरी
लक्तरेही वाचलेली ओढणारे लाभले

नेसलेले सोडताना नाचले बेभान ते
षंढ होउन तो तमाशा पाह्णारे लाभले

झोपडीला जाळताना हात नाही कापले
गंध राखेचे कपाळी फासणारे लाभले

ऐनवेळी वास्तवाला टाळणारे भेटले
कर्तव्याला भावनेशी गुंफणारे लाभले.

गझल