जिंकण्याची एवढी केली तयारी
हारणे झाले मला मग खूप भारी
का विठोबा पावला नाही मला तू
सोडली नाही तुझी मी एक वारी
पाखरांची शेवटी रे हार झाली
माणसांनी घेतली जेंव्हा भरारी
आजही आकाश बघ तेथेच आहे
ये जरा तू चार भिंतीतून दारी
साप जेव्हा विष विकाया लागले मग
तेवढे ते राहिले नाही विषारी
एकदा जवळून बघ जळ्ती चिता तू
शेवटी ही आग नसते संपणारी
जिंकला तू ज्या भरोशावर लढाया
ती तुला झाली अता तलवार भारी
- अभिषेक उदावंत
संवेदना रायटर्स कम्बाईन, अकोला
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा