वारूस यौवनाच्या नाही लगाम आता
चाऱ्यास चरस, गांजा, पाण्यास जाम आता
पाडाव पांडवांचा युद्धात का न व्हावा?
कॄष्णात जर तयांच्या, उरला न राम आता
पैसाच देव झाला, पैसाच धर्म झाला
पैश्यास पूजते ही जनता तमाम आता
हे सत्य स्वस्त झाले, लाचार अन अहिंसा
बापू तुम्ही नि तुमची, तत्वे निलाम आता
भगवान आजचा हा, भगवान तो उद्याचा
सूर्यास उगवतीच्या सारे सलाम आता
दु:खातही हसावे, जे सांगती दुज्यांना
सारी सुखे तयांच्या, चरणी गुलाम आता
लखलाभ हो तुम्हाला, दुनिया खुशाल तुमची
म्हणतो 'मिलिंद' माझा, घ्या रामराम आता
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा