लिहायचे ते लिहून टाकू इथे कुणाची फिकीर आहे?
कुणी न येथे हुजूर माझा न मी कुणाचा वजीर आहे
हवी कशाला पुढील जन्मातली तुझी गोड गोड वचने
क्षणावरी शंभरी उधळण्या मुळात कोणास धीर आहे?
जुनाट सीत्कार मीलनाचे कुशीत कंटाळतात तेव्हा
मनामनांना पटून जाते 'पुढ्यात आता शरीर आहे'
'विरू नये डौल' या भयाने मुलास माता जवळ करेना
मनात येथे 'पगारवाढी', स्तनात नाकाम क्षीर आहे
अनेकवेळा सुधारण्याचा विचार आला, फसून गेला
कुणीतरी आपल्यात आहे स्वभाव ज्याचा फुटीर आहे
क्षणाक्षणांना विचार साऱ्या, गुपीत माझ्या यशस्वितेचे
'जगायलाही अधीर आहे, मरायलाही अधीर आहे'
उन्हात सुनसान एक रस्ता, घरे न झाडे, तहान केवळ
तिथे निरुद्देश चालणारे अनाथ जीवन फकीर आहे
समुद्र त्याच्या विशालतेला जिथे तिथे गाजवून गेला
तहानला की पुन्हा विचारेल 'सांग कोठे विहीर आहे'
समान अर्थी असूनही शब्द, हौस भारीच या जगाला
अनर्थ म्हणजे 'पदोपदी' अन सुदैव म्हणजे 'उशीर' आहे
'तुझ्याविना का जगू' वगैरे, असा कधी प्रश्न येत नाही
तसा गळा काढण्यास येथे अमीर आहे नि मीर आहे
उतारवयही कबूल करते, 'घड्याळ घालायचे कशाला? '
(अजून थोडे, अजून थोडे, समोर आलाच तीर आहे)
हजारदा एक एक नाते जपायला टाकले रफूला
नव्या नव्या अस्तरांमुळे ही त्वचा मनाची फुगीर आहे
तृतीयपंथी जगात दावा उगाच मर्दानगी कशाला?
हरेक चोळी बधीर येथे, हरेक 'लुगड्यात वीर' आहे
मनात येते तुका बनावे, मनात येते कबीर व्हावे
मधेच ती आठवून जाते मुळात मी 'बेफिकीर' आहे
(इतरत्र प्रकाशित)
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा