माझी गझल ...
भावनांना साथ द्याया, जागते माझी गझल...
रोम-रोमांतून माझ्या, वाहते माझी गझल...
मी घराची वाट धरता, रोजच्या मार्गावरी;
लाजुनी-शृंगारुनी मज भेटते माझी गझल...
मी तिच्याशी भांडता, हटकून वृत्तांच्यावरी;
पाहणे मजला पुन्हा, मग टाळते माझी गझल...
जे मला ना बोलता येते कधी ओठांतुनी;
तेच सारे व्यक्त करणे, साधते माझी गझल...
मी तिला अर्ध्यातुनी, सोडून जाता एकटी;
वाट माझ्या आगमाची, पाहते माझी गझल...
कागदावर रेखताना, मी तिला चित्रातुनी;
रूप अपुले देखणे, न्याहाळते माझी गझल...
मी तिच्याशी गुंतलो अन् नावचे माझ्या अता;
रोजला सौभाग्यलेणे, लावते माझी गझल...
- निरज कुलकर्णी.
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा