माझ्या कुशीत...

प्रदीप कुलकर्णी - ⏱ १ मिनिट

..........................................
माझ्या कुशीत ...!
..........................................

माझ्यासवे निवांत बोलणार आज मी !
माझा नवाच अर्थ शोधणार आज मी !

वेडा, खुळा असेन, मी असेन बावळा...
तुमच्या सभेत खास शोभणार आज मी !

आलास तावडीत आज तू बरा मना ...
आता तुला तसा न सोडणार आज मी !

काढू पुन्हा तुझा कशास मी खुजेपणा ?
माझीच रेष उंच ओढणार आज मी !

डोळ्यांत दाटतात कोरडीच आसवे...
कुठले कळे न दुःख सोसणार आज मी !

थोडी तरी हवीच हालचाल भोवती...
या सावलीत प्राण ओतणार आज मी !

घेऊन सोबतीस तोच एकटेपणा...
माझ्या कुशीत गाढ झोपणार आज मी !

- प्रदीप कुलकर्णी

गझल