माणसांना माणसांचे वागणे कोडेच होते
ते असे का वागले, हे नेहमीचे पेच होते
हे असे माझे तुझे करण्यात सारा वेळ गेला
मान्य आहे ना तुलाही - आपले चुकलेच होते?
आज आता सारखा मी का जगाला बोल लावू?
उत्तरे माझीच होती, प्रश्नही माझेच होते
तू उगीचच अर्थ मोठा शोधला होतास तेव्हा
शब्द जे बोलून गेलो ते तसे साधेच होते
पेन्सिलीने काढताना सर्व काही छान असते
कुंचल्याने रंगल्यावर चित्र ते भलतेच होते
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा