मधेच वाहते मधेच थांबते

जयदीप - ⏱ १ मिनिट

मधेच वाहते मधेच थांबते
हवा कुठे मनानुसार वागते?

चढून चार पावलात पोचलो
शिखर तुझे दुरून उंच वाटते

असेच रोज येत जात राहुया
नको म्हणूस पायवाट लोपते

उशीर व्हायचा असेल जर तुला
फलाट सोडताच ट्रेन थांबते

हवे असेल तेवढेच घ्यायचे
असे करून पान स्वच्छ राहते!

जयदीप

गझल