मी मोजत असते रात्री

सोनाली जोशी - ⏱ १ मिनिट

मी मोजत असते रात्री ,ते चमचमणारे तारे

मी मोजत असते रात्री ,ते चमचमणारे तारे
गुणगुणून जाते तेव्हा गीतास तुझ्या हे वारे

का तुला पसारा दिसतो अन् ही उरलेली कामे
जाणून कशा घे गेल्या त्या रात्री तुझ्या विचारे

पडदाही सरकवला मी अन् घट्ट लावली खिडकी
आवाज कशाचा आला? आतून कोण झंकारे?

वळवून मान ती बघते, ओढणी सारखी करते
इतके करून म्हणते मी केले ना कधी इशारे

या वादळात हो तूही एकदा हवाली माझ्या
असलो मी उधाणलेला तरीही जपतो किनारे

केव्हा सांगू, काय लिहू , येईल पसंतीस तुझ्या?
बघ गेले हरवुन यातच कसे शब्द माझे सारे

-सोनाली जोशी

गझल