...मी नवा-निराळा आशय !

प्रदीप कुलकर्णी - ⏱ १ मिनिट

.......................................................
...मी नवा-निराळा आशय !
.......................................................


एवढीच ओळख माझी; एवढाच माझा परिचय !
रोजच्याच शब्दांमधला मी नवा-निराळा आशय !


सोस का तुला हा इतका ? थांबवून करशी सांत्वन...
सोसण्यात माझ्या आता हा तुझा असा का व्यत्यय ?


कोरडे तुम्ही अश्रूंनो ! दाखवा जरा अपुलेपण...
वाळवंट आयुष्याचे मी करू कशाने जलमय ?


वाकवू बघे मज दुनिया...वाकणार नाही मी पण...
मोडलो़; तरीही केला मी पुन्हा पुन्हा हा निश्चय !


ऐकवे न दारावरची सारखी मलाही टकटक...
पाहिजे तिथे दुःखाला शेवटी मिळाला आश्रय !


तू सदेह यावे हृदयी काढता तुझा मी आठव...!
मी तुझ्या निराकाराला पाहण्यात व्हावे तन्मय !!


जे घडायचे त्याची का बांधता न आली अटकळ ?
का घडून गेले त्याचा लावता न आला अन्वय ?


नेहमीच विश्वासाने बोलतो जरी दोघे जण....
का तरी तुलाही माझा अन् तुझा मलाही संशय ?


वाटते तसे हे सोपे; पण तसे किती हे अवघड...!
नेटके असावे लिहिणे...रोकडा असावा प्रत्यय... !!


- प्रदीप कुलकर्णी

गझल