मी फुलांची मूक भाषा जाणतो
दाह त्यांच्या आसवांचा जाणतो....१.
रोज मी जातो खुल्या पायी वनीं
कंटकांचा ही जिव्हाळा जाणतो !....२.
मी वनाच्या सर्व वाटा पाहिल्या
लूटला जाणार केव्हा जाणतो....३.
पारध्यानो ! , या शिका भाषा नव्या
पाखरांच्या सर्व भाषा जाणतो !....४.
पाखरानो ! या बसा, जाऊ नका
मी भयांच्या सर्व वाचा जाणतो....५.
ये जरा तू आज माझ्या ही घरी
हा अबोला का असावा जाणतो....६.
फार नाही आज मी रडणार रे...
मी तुझ्या ही भावनांना जाणतो....७.
प्रेम नाही फार कोणी ही करू
खेळ हा सोपा न साधा जाणतो....८.
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा