मी व्यथांना अंतरीचे गाव देतो

प्रसन्न शेंबेकर - ⏱ १ मिनिट

मी व्यथांना अंतरीचे गाव देतो
आसवांना पावसाचे नाव देतो

सागराने ऐनवेळी घात केला
वादळाहातीच आता नाव देतो

नेमकी येते भराया जखम जेव्हा
सांत्वनाचा स्पर्श तेव्हा घाव देतो

मागतो जो तो फुले ताजीतवानी
कोण निर्माल्यास येथे भाव देतो

खेळूनी झाले पुरे आयुष्य माझे
ये अरे मृत्यो! तुलाही डाव देतो

हासलो आजन्म खोट्या चेहर्यांनी
आज दु:खाला जरासा वाव देतो

( अल्बम : स्पर्श चांदण्यांचे , संगीत : श्री विवेक काजरेकर , गायक : श्री सुरेश वाडकर )

गझल