...मनातच

संतोष कुलकर्णी - ⏱ १ मिनिट

धार्मिकतेच्या तटबंदीचा कोट मनातच...
विद्रोहाचा दारूगोळा...स्फोट मनातच...


सुंदर स्वप्नांच्या शापाने हुळहुळते जग...
चाटत बसते रोज मधाचे बोट मनातच...


केली नेत्यांनी गरिबांची चिंता जेव्हा..,
आशेनेही भरले त्यांचे पोट मनातच...


दांभिकतेचा, बेशिस्तीचा लोंढा आला,
विझवा सात्विक संतापाचे लोट मनातच


मौनामधुनी फुलवत जावे आठवणींना..,
स्वप्नांचीही बांधत जावे मोट मनातच...


डोळ्यांवरती झापड असते विश्वासाचे...,
दिसते कोठे..! मित्रांच्याही खोट मनातच...!


त्यांचे त्यांच्या लोकांशीही जमले नाही
प्रत्येकाने धरला गनिमी गोट मनातच


सवयीने मी घेतो आता थोडा थोडा
आकांक्षांच्याही नरडीचा घोट मनातच...

                                                - प्रा.डॉ.संतोष कुलकर्णी, उदगीर

गझल