जगण्यास मंत्र व्हावा माझेच गान आता
अन् पावलास यावे रस्त्यात भान आता
सत्यास लाटले या लाचार पंडितांनी
लपले कुठे सुखाने संतप्त ज्ञान आता ?
तलवार वा सुऱ्याने मज मारता कशाला ?
शब्दास धार लावा तुटण्यास मान आता.
माझी खरी कहाणी तू ऐकली कशाला ?
दु:खास आसवाचे देशील दान आता !
कैदी जरी असे मी कविता न कैद माझी
लाखो मुखात साध्या राखील स्थान आता
मातीत सांडले ते माझेच रक्त होते
फुलले म्हणे अचानक ओसाड रान आता
मौनावरीच माझ्या चर्चा जनात चालू
एकान्त बोलतो मज ,बोले स्मशान आता
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा