ना दिवाळी पाहिली या लक्तराने !!!

supriya.jadhav7 - ⏱ १ मिनिट

ना दिवाळी पाहिली या लक्तराने !!!
.
*

ज्ञान का वाढे कुणाचे दप्तराने,
ना फ़ुलासी गंध येणे अत्तराने!

*

थांबवा थोतांड भोंदू-दांभिकांचे,
का खरे मरतात कोणी पंचकाने?

*

कुंभकर्णी वंश माझा हीच ख्याती,
का उडावी झोप एका ’दस्तकाने’ ?

*

माजलेली घूसखोरी आत्मघाती,
घेतली का दाद काही लष्कराने ?

*

पावणे ना देव कोणाही बळी दे,
गांव वेडा शेंदरी या ’पत्थराने’ !

*

भव्य होती रोषणाई त्या महाली,
ना दिवाळी पाहिली या लक्तराने !

*

-सुप्रिया (जोशी) जाधव.

गझल