नार ही...!

प्रदीप कुलकर्णी - ⏱ १ मिनिट

..........................
नार ही...!
..........................


राम आयुष्यात नाही; जानकी नाही !
तेवढी नाहीच; माझी लायकी नाही !


दान दैवाने दिले भरपूर दुःखांचे...
नेमकी माझीच झोळी फाटकी नाही !


जाहली शहरांपरी नखरेल गावेही...
राहिली गावांत आता गावकी नाही !


चारचौघांच्यात कोठे ढाळता येती ?
आपुली अश्रूंवरीही मालकी नाही !


चार शब्दांनी तुझ्या हुरळू कशाला मी ?
सांत्वनाची रीत का ही नाटकी नाही ?


यातली काही फळे आहेत वाणाची...
ही अढी सारीच काही नासकी नाही !


सोसण्याचे खेळ सारे दावुनी झाले...
मात्र कोणीही दिली शाबासकी नाही !!


ऐनवेळी राखतो अवसान शर्थीने...
तेवढा नाही, मना, मी घातकी नाही !


मी तुला मोठ्या मनाने माफही केले...
चूक ही माझी परंतू बारकी नाही !


आर्जवे जो तो करी येथे प्रसिद्धीची...
नार ही सांगा कुणाची लाडकी नाही ?


-प्रदीप कुलकर्णी

गझल