निर्जीव वादळ

भूषण कटककर - ⏱ १ मिनिट

माझ्या गळा कधीही जाऊ नको तळाशी
येई नको नको ते चिकटून या गळाशी

'उडवून देत जावा, घ्यावी मजा तयाची'
बस एवढाच देवा संबंध गोंधळाशी !

ज्याच्यामुळे तळ्याची होते नदी प्रवाही
त्यालाच लोक टाकी वाळीत त्या जळाशी

संबंध जोडताना आयुष्य घालवावे
अंतास जाणवावे..मी एकटा पळाशी

माझी जमीन आहे, उगवून घे, बहर तू
रसिकाशिवाय पूजा येईल का फळाशी?

वाईट वाटते की दोन्ही तुझेच असती
पण आपसात लढते बुद्धी तुझ्या बळाशी

इतिहास याद आहे, 'धुतले किती तयांना'
जे आज सांगती की "कर्तव्य ना मळाशी"

लाटेसहीत येते, लाटेसहीत जाते
रेती गरीब होते धडकून कातळाशी

सांगीतले कुणी रे कविता रचायला या?
संबंध काय आता माझा तुझ्या छळाशी?

अध्यात्म सांगणारे आले बरेच, गेले
उपभोग ऐहिकाचे सांधून  केवळाशी

हे जीवना तुला मी कंटाळलोय आता
झुंजायचे किती मी 'निर्जीव वादळाशी'?


 






 

 

गझल