नीट वाच...!

प्रदीप कुलकर्णी - ⏱ १ मिनिट

कविवर्य सुरेश भट यांचा आज (15 एप्रिल) जन्मदिन.
त्यांना विनम्र आदरांजली.
................................................................

............................................
नीट वाच...!
............................................

ही निष्कर्षाची कशास इतकी घाई ?
वेड्यात मला काढून शहाणा जाई...

हा काळ निर्दयी नागवतो सगळ्यांना...
आयुष्य न देई कशाचीच भरपाई

मज मधून येते जाग उदास सुरांनी...
कोणास्तव गाते रात्र मुकी अंगाई ?

मी जुनेच, सारे जुने आठवत बसतो...
मज जुनेपणाची कशास ही नवलाई ?

अद्याप न माझा शोध संपला माझा...
मी गवसत नाही मलाच माझ्या ठाई !

अश्रूंची पोरे पुन्हा पोरकी झाली...
मौनात मुसमुसे आकाशाची आई!

लागेल नव्याने अर्थ पुन्हा एखादा...
तू नीट वाच मी शिंपडलेली शाई!

- प्रदीप कुलकर्णी
.................................................

गझल