मी जिवाची अपुल्या चेतवुनी वात पुन्हा;
दाट काळोख पुसायास बसे गात पुन्हा
पाहिले वाकुन तू लाजत पाण्यावरती
दावला एक नवा चंद्र तलावात पुन्हा
पूर्ण गावात तुझ्या एक दिसेना पुतळा--
कोणता सांग तुझा धर्म तुझी जात पुन्हा?
या स्थळी शोध उद्या तू मिलनाची किरणे
चांदणे सांडुन जाईल इथे रात पुन्हा
योजना पारित होतील महालांकरिता--
लोक विस्थापित होतील प्रकल्पात पुन्हा
पाळले पोपट खातात हमेशा हुरडा--
शोधतो एक अम्ही घास कुटारात पुन्हा
तू नको न्हाउस पाण्यात खुले या प्रहरी---
लावते काय उभी आगच डोहात पुन्हा?
खुद्द वाऱ्यावर ज्याचे जगणे विस्कटले--
तो जगाचीच व्यथा बांधिल शब्दात पुन्हा !
मी कळ्या टाळुन काटे उचलाया फिरतो---
कोण देईल मला साथ प्रवासात पुन्हा ?
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा