ओळख

मधुघट - ⏱ १ मिनिट


रोज पटते मज नवी ओळख पुराण्या माणसांची...
मी अताशा रोज करतो ही हमाली वेदनांची!

 बोलसी का सारखे तू आणुनी डोळ्यांत पाणी?
धारही वाहून गेली आज तुझिया आसवांची!

 पाहिले माझ्याकडे परतून तू अन वाटले की...
काहिशी भरपाइ झाली तू दिलेल्या यातनांची!

ज्या क्षणी विझले दिवे माझ्यासमोरी पेटलेले..
संपली तेव्हाच गर्दी मागच्या त्या सावल्यांची!

भांडती का रोज बोके मिळवण्या लोणी इथे हे?
तुंबडी भरते अशाने रोज काही माकडांची!




गझल