पाहतो श्वासात कोठे . .लागतो काही सुगावा

प्रसन्न शेंबेकर - ⏱ १ मिनिट

पाहतॊ श्वासात कोठे लागतो काही सुगावा
काल् तू होतीस ह्याचा शोधतो आहे पुरावा

अंगणापर्यंत माझ्या आसवांची रेष जाते
काय माझा चंद्र गेला ह्याच वाटेने असावा?

ही दुहेरी रीत एका माणसाला शोभते का ?
"जाउ दे ना" ही म्हणावे हात ही हाती धरावा

ती म्हणाली "माग ना रे. . . तू, मला सोडून काही"
(आरसा बघशील तेव्हा चेहरा माझा दिसावा !)

काय अंधारून आले माझीया प्राणांसभोती
भास् आहे की तुझ्या घनदाट छायेचा विसावा ?

लागलॊ जेव्हा जळाया यातना झाल्या न काही
पोसले आजन्म ज्याला , देह हा माझा नसावा

गझल