पायथा बांधायला आधार नव्हता जोरकस
देणग्यांच्या जाहिराती झाकती आता कळस
सोडली देवास कन्या, पूत्र दे देवा म्हणत
त्या मुलीला पूत्र झाला, देव चुकला की नवस
आणले आहेत आपण खुद्द......हे दुर्लक्षुनी
बोलतो प्रत्येकजण की काय हे आले दिवस
पोलक्याची पाठ खेचे सभ्यतेला खालती
चेहर्याचा राग बोले बघ मवाल्याची हवस
ह्या समाजाला स्वतःची आसवे पुरतात की
पावसाला सांग मित्रा तू हवे तेव्हा बरस
मन असे का तडफडे हे तू विचारावेस ना
का दुराव्याची कधीही टोचली नाहीस लस
गुंतलो शोधात इतका की कळेना हे मला
पौर्णिमा होती हवी की पाहिजे होती अवस
दोन रस्ते राहिले आहेत दोघांच्यापुढे
मी इथे जाऊन फसतो तू तिथे जाऊन फस
का इथेसुद्धा असा अस्वस्थसा आहेस तू
घर तुझे आहे स्वतःचे तर जरा टेकून बस
मनगटे देतील पाठिंबा तुला तेव्हाच ही
सापडावी लागते मुर्दाड लोकांचीच नस
हेच हे अभ्यासण्यामध्ये निघाला जन्म हा
हा सरस की तो सरस की तो सरस की तो सरस
छान गझलेचा निकष इतकाच आहे राहिला
कस जगाचा लागतो अन् 'बेफिकिर' लिहितो सकस
-'बेफिकीर'!
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा