पहिल्यासारखे

गौतमी - ⏱ १ मिनिट

श्वास पहिल्यासारखे, नि:श्वास पहिल्यासारखे
लाडक्या येतील का मधुमास पहिल्यासारखे?


पाहणे मी वाट, येण्याची तुलाही ओढशी
आजही होतात मजला भास पहिल्यासारखे


आवरावे मी तुला, ना आवरावे तू मला
छेड आधीसारखा, दे त्रास पहिल्यासारखे


आजही मी काळजीने केस विंचरते उगी
शोधते केसांत गुंते खास पहिल्यासारखे


कष्टणे दिवसा, तुझे झोपू न देणे रातचे
एकदा व्हावेत सासुरवास पहिल्यासारखे


दूर तू जातोस तर आलिंगने घेऊन जा
गंध लगडावे तुझ्या अंगास पहिल्यासारखे


 

गझल