प्राक्तन फ़िदाच झाले

गंगाधर मुटे - ⏱ १ मिनिट

प्राक्तन फ़िदाच झाले

प्राक्तन फ़िदाच झाले यत्नास साधताना
मोती पुढ्यात आले वाळूस गाळताना

हलक्याच त्या हवेने का कोसळून जावा ?
हेका उगीच होता तो स्तंभ बांधताना

पिकल्या फ़ळास नाही चिंता मुळी मुळीची
दिसलेच ना कधीही हितगूज सांगताना

शोधात भाकरीच्या निम्मी हयात गेली
स्वप्नेच वांझ झाली तारुण्य जाळतांना

द्रव्यापुढे द्रवीतो का कायदा म्हणावा?
नेमस्त गांजलेले कानून पाळताना

आता "अभय" जगावे अश्रू न पाझरावे
आशेवरी जगावे ही वाट चालताना

गंगाधर मुटे

गझल