प्रदेश...

प्रदीप कुलकर्णी - ⏱ १ मिनिट

............................
प्रदेश...
............................

द्यायचा किती स्वतःस त्रास आणखी ?
व्हायचे कसे, किती उदास आणखी ?

एवढ्यात थांबली कशी तुझी कथा ?
तू लिहायला हवेस खास आणखी !

शोधले तुझ्यात अन् स्वतःतही तुला...
मी तुझा करू किती तपास आणखी ?

ये अजून, ये अजून, ये, समीप ये...
अंतराय फक्त एक श्वास आणखी !

जीवना, शिकायचे अजून मी किती ?
लांबणार का उगाच तास आणखी ?

वागतो तुझ्यासवे नमून मी जसा...
वाढते तशी तुझी मिजास आणखी !

जायचे अजून मी पुढे पुढे किती ?
लागतो प्रदेश हा भकास आणखी !

- प्रदीप कुलकर्णी

गझल