परीक्षा

आनंदयात्री - ⏱ १ मिनिट

कशाला अपेक्षा पुन्हा भेटण्याची?
नको ती परीक्षा पुन्हा विलगण्याची


कितीदा जगाला पुन्हा तेच सांगू?
कुणा काळजी सत्य ते ऐकण्याची?


चव्हाट्यावरी कोणते दु:ख आले?
सवय लागली दु:ख सांभाळण्याची?


अबोल्यात लपले खरे प्रेम होते
चढाओढ होती नजर टाळण्याची


अता भिस्त तुझिया समंजसपणावर
अता फक्त आशा तुझ्या परतण्याची


उभा मीच माझ्या सवे आणि मागे
न भीती मला सावली हरवण्याची


कुणी लाज सोडून फिरतेच आहे
तयारी स्वतःला करा झाकण्याची


उशीरा कळे, चूक माझीच झाली
पुन्हा चेहरा हा खरा मानण्याची


तुझे दाटणेही अवेळीच होते
गरज काय होती तुला बरसण्याची?

गझल