परिस्थितीच्या उन्हात...

जनार्दन केशव म्हात्रे - ⏱ १ मिनिट

परिस्थितीच्या उन्हात हे आयुष्य करपले माझे
कर्तव्याच्या जात्याने... जगणेच भरडले माझे

वयाअगोदर... चेहर्‍याचे वयमान.. वाढले आहे
शोधामध्ये कसल्याशा... बालपण हरवले माझे


"स्वत:स जप तू" असे आजवर कुणी बोलले नव्हते
तुझे 'शब्द' ऐकून... ह्रदय.. अश्रूत तरळले माझे


जिद्द अशी की... आकाशाला कवेत घेइन माझ्या
घाव सोसुनी... ध्येय असे मजबूत बनवले माझे


उलट्या-सुलट्या खूप कसरती आयुष्याने केल्या
कसरतीत त्या प्राक्तन आता अभेद्य बनले माझे


जन्माआधी... बहुदा.. माझी निवड चुकीची ठरली
उगाच माणुसपण निवडुन मी सौख्य गमवले माझे


- जनार्दन केशव म्हात्रे
२/ खलिफा निवास, गांधी नगर, जुना बेलापूर रोड,
कळवा-ठाणे ४००६०५.  भ्रमणध्वनी: ९३२३५५५६८८

गझल