गवसता भासला, उजवा जणू
चिकटला तोच मग, जळवा जणू
सहजता भोवती , इतकी अशी
न घडल्या कत्तली, परवा जणू
निबर ते, लाज ना, उरली मना
चघळती प्रश्नही, हलवा जणू
उसळते रक्त हे, पुरते कुठे ?
हरवला मावळा, भगवा जणू
दुखविता भावना, खपली निघे
भडकती माणसे, वणवा जणू
दहशती जागती, दिवसा तिथे
खलबते 'राम' ही, अफवा जणू
निवडले मार्ग ते, अडले असे
चुकविले चालता, 'अथवा' जणू
उजळणी मांडता, कलत्या क्षणी
उमगले जन्म हा, फसवा जणू
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा