पसारा !

प्रदीप कुलकर्णी - ⏱ १ मिनिट



पसारा !

कधीच हा जन्म खाक सारा झाला !
तरी कुठे गार हा निखारा झाला ?


नकोस काढू पुन्हा फुलांच्या गोष्टी
पहा, पुन्हा हा उदास वारा झाला !


कुणास आता तुझी न वाटे भीती...
तुझा कशाने कमी दरारा झाला ?


समीप येऊ न दें कुण्या लाटेला...
असा कसा कोरडा किनारा झाला ?


जरा कुठे काढले न डोके वर मी
कुणाकुणाचा कुठून मारा झाला !


दिली न वेळेवरी कुणाला ओ मी
कधी न माझा पुन्हा पुकारा झाला !


उगीच मी काळजी जिण्याची केली
कसाबसा शेवटी गुजारा झाला !


पुन्हा अचानक भरून आले डोळे...
पुन्हा अचानक धुरकट तारा झाला !


नको नको ते विचार वाढत गेले...
मनात माझ्या किती पसारा झाला !


- प्रदीप कुलकर्णी

गझल