पुन्हा केव्हातरी

क्रान्ति - ⏱ १ मिनिट

संवाद काही राहिले, साधू पुन्हा केव्हातरी
काही तराणेही नवे, छेडू पुन्हा केव्हातरी!

"सांगू पुन्हा केव्हातरी" नादात मागे राहिल्या,
सांगायच्या गोष्टी अशा, सांगू पुन्हा केव्हातरी

झाले कधी हाराकिरीचे वाद; केली भांडणे,
तेव्हा असे का वागलो, बोलू पुन्हा केव्हातरी

दोघांसही काहीतरी होते जरी मागायचे,
आली कधी ना वेळ ती, मागू पुन्हा केव्हातरी!

सांगून नाही भेटलो तेव्हा; कधी भेटूनही
हे एवढेसे बोललो, "भेटू पुन्हा केव्हातरी"

आयुष्य शोभादर्शकाच्या काचनक्षीसारखे,
काही नवे आकारले, पाहू पुन्हा केव्हातरी!

गझल