फुलांना जर असे आहेच कोमेजायचे
कशाला जीव लावुन ताटवे फुलवायचे
कशासाठी पसारा मांडला तू एवढा?
तुला आहेत सारे सूर्य जर वि़झवायचे
पुन्हा भिजलो न मी , भिजलो मिळुन दोघे जसे
विसरले मेघही नंतर तसे बरसायचे
विचारे सारखी येऊन आठवणीत ती
'किती वेळा ठरवले तू मला विसरायचे'
नको पाहू अशी तू एकटक माझ्याकडे
तुझ्या डोळ्यात माझे गीतही हरवायचे
'पुन्हा भेटू 'जरी म्हटले निरोपाच्या क्षणी
उमजलो मी,पुन्हा नाही कधी भेटायचे
सदा माझे तुझे माझे तुझे माझे तुझे
अमीबांचे कधी या विश्व विस्तारायचे
तुला बघताच माझी गझल बोलू लागते
मला नाहीच जमले पण कधी बोलायचे
प्रमोद बेजकर
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा