"राहिले न आजकाल वाचण्यासारखे" ...
वाचले कधीतरी, न वाचल्यासारखे
वेदना म्हणे सुखास, "काय रे बाधले? "
पाहिलेस तू मला न पाहिल्यासारखे
वाटुनी जमीन काय साधले पुण्य मी ?
बीज एकही न आज उगविण्यासारखे
एकदा मिठीत दु:ख घेतले अन् पुन्हा -
राहिले न बाहुपाश बिलगण्यासारखे
ताठ मान घेवुनी फिरे जगी, पण तिथे -
रोज येत जात तोंड लपविल्यासारखे
वादळे मला बघून गोठली, पण तरी -
माजले विचार आत वादळासारखे
मोकळ्या हवेत चल फिरून येऊ सखे
फार ठेविशी मनात सांगण्यासारखे
दोन प्रेमशब्द दे, उगाच टाळू नको -
आणि ते नकोत थाप मारल्यासारखे
माणसे अता कमीच राहिली भूवरी
वागले पशू कळून माणसासारखे
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा