... राहिलो मी

अजय अनंत जोशी - ⏱ १ मिनिट

हातात पुष्पमाला सजवून राहिलो मी
हलकेच गाठ सुटता उधळून राहिलो मी


बस रोखण्यास गेलो, तिरप्या अनेक नजरा
निर्लेप आंत बसले, लटकून राहिलो मी


स्वच्छंद धुंद विहरू, सागर तटात गाऊ
प्रेमात भावनौका उलटून राहिलो मी


जगणे मधूर आहे, चाखू कसे कळेना
कडुनिंब पालवीला चघळून राहिलो मी


जीवन कसे जगावे? अर्थास मान आहे
देवाला एक सारे चुकून राहिलो मी


कैफात वाट वळुनी माडीवरी निघाली
चुकलो कसे कळाले उतरून राहिलो मी


आता कशास चिंता, सारे रिते असू दे
विश्वात एक तुजला मिळवून राहिलो मी

गझल