.....................
राज्य दुःखाचे...
.....................
फुलांची फार झाली कौतुके !
कधीपासूनचे काटे मुके !
सुखे आहेत; दुःखेही तशी...
कधी ओले;कधी आहे सुके !
सुटे ती...पोचण्याआधीच मी
- अशी माझीच का गाडी हुके ?
पहाटेचीच त्याला ओढ का ?
पहाटेलाच का वेढी धुके ?
तिथे तो...तूच तू आहेस का ?
तिथे जो दूर तारा लुकलुके ?
उभे आयुष्य द्यावे लागले...
मिळाले अर्थ का कविते, फुके ?
पुन्हा स्वप्नात आली भाकरी..
कुणी माझ्यातले मेले भुके !
कधी मी एकदा चुकलो जरा...
स्मरे ती चूक अन् मी चुकचुके !
कधी शिकलास माणुसकी अशी ?
कधी शिकलास तू इतकी बुके ?
तिला सांगायचे काहीतरी...
डहाळी साऱखी खाली झुके !
क्षमा मागायची का ? मागतो !
तुझे कोठे ? अरे, माझे चुके !!
तुझे ऐकेन मी काही कसे ?
जरी हाती तुझ्या हे दंडुके !
किती हे राज्य दुःखाचे बडे...
किती आहेत जिल्हे; तालुके !!
- प्रदीप कुलकर्णी
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा