रक्तातल्या रसांनो

भूषण कटककर - ⏱ १ मिनिट

वेचा नवीन आशा माझ्या नसानसांनो
बदल्यात व्हा प्रवाही रक्तातल्या रसांनो


कोणीच जन्म घेण्या केला न अर्ज येथे
रागावता कशाला विक्षिप्त माणसांनो?


मी तर तयार होतो सोडायला जगाला
ना एकजूट झाली तुमचीच साहसांनो


आनंद शोधताना उत्साह आळसावा
इतका न दाखवावा उत्साह आळसांनो


मी ओसरी भटाला देऊन चूक केली
फोफावता किती रे हृदयात आकसांनो?


कवितारसास अजुनी मी शोषणार आहे
चोरू नका घराणी  इतक्यात वारसांनो


आशा, अधीर इच्छा अन वासना, अपेक्षा
पोषाख गोंडसांचे अंगात राक्षसांनो?


 


 


 

गझल