तुझ्यावाचुनी सखये... विरले रंग नभाचे
तुला शोधता... कुठे हरवले रंग नभाचे
तुझ्याविना एकाकी भिजणे जमले नाही
चिंब-चिंब... होवुनही हरले रंग नभाचे
शांत.. इथे मी, उदास.. तू आहेस तिथे
दोन तिरावर... रुसून बसले रंग नभाचे
किती तुझ्या अन् माझ्यामधले अंतर हे
निरोप नाही... कुठे हरपले रंग नभाचे
मनासारखी स्वप्ने, मी ही सजवित होतो
श्रावण फुलला पण विस्कटले रंग नभाचे
तुझ्या मनीचे माझ्या ह्रदयी साचत आहे
ओल्या-ओल्या नयनी वसले रंग नभाचे
विरहाचे हे मळभ अताशा... दूर जाहले
भेट तुझी होताच... बिलगले रंग नभाचे
निरभ्र आकाशी बघ... आले इंद्रधनू हे
तू हसलिस अन गाली खुलले रंग नभाचे
प्रवास थकला, शोध संपला, सार्थक झाले
खोल तुझ्या डोळ्यात गवसले रंग नभाचे
- जनार्दन केशव म्हात्रे
२/ खलिफा निवास, गांधी नगर, जुना बेलापूर रोड,
कळवा-ठाणे ४००६०५. भ्रमणध्वनी: ९३२३५५५६८८
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा