साचला अंधार आहे युगभराचा
अन दिवा हातामधे काही पळाचा
कोण राबुन जात असते रोज येथे
दव म्हणू की घाम असतो हा कुणाचा
मी कधीचा नांगरुन बसलो स्वताला
पण अजुन पत्ताच नाही पावसाचा
मीच माझ्या जीवनी कुंद्याप्रमाणे
मीच दुश्मन जाहलो माझ्या पिकाचा
जीवनाचा मी तुझ्या आनंद आहे
तू कधी आनंद हो माझ्या क्षणाचा
मिसळुनी घेतो मला मातीमध्ये मी
मग पिकाला वास येतो चंदनाचा
फोडतो मी पाठ माझी आसुडाने
मीच आहे बैल माझ्या नांगराचा
- वैभव देशमुख
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा