...शांत समईसारखा !

प्रदीप कुलकर्णी - ⏱ १ मिनिट

...............................
...शांत समईसारखा !
...............................


वाट माझी संपता, येतील मागे मग किती ?
जीव देणारे जिवाला राहिले जिवलग किती ?


कैद मी भोगून आलो कैक वर्षांची जणू...
- आणि हे बदलून गेले भोवतीचे जग किती !


झुंज माझ्याशीच माझी चाललेली हारलो...
शेवटी मीही तसा धरणार होतो तग किती ?


वागणे आता मला झाले कळेनासे तुझे...
यायची घाई किती अन् जायची लगबग किती !


पाहिजे तितकी न खुलली रातराणीची कळी...
लागली आहे तिला या चांदण्याची धग किती !


नेहमीच्या त्याच त्या टाळ्या, हंशे ते, ते बघ्ये...
नेहमीचा तोच तो वठवायचा मी वग किती ?


चार डोळ्यांतून गेला शेवटी बरसून तो...
दाटले होते अबोल्याचे मनांवर ढग किती !


भेटण्यासाठी मला तू एकदा ये...एकदा... !
या जिवाची आणखी तडफड किती ? तगमग किती ?


कोण जाणे कोणते घेऊन ओझे मी जगे....
काळजाला लागली आहे कधीची रग किती !


तू असा भ्रमतोस का ? श्रमतोस का ? वेड्या मना...
ही कुणासाठी ? कशासाठी तुझी दगदग ? किती ?


आशयाची ही शिदोरी नीट ने सांभाळुनी....
व्यर्थ शब्दांचे तुझ्या वाटेवरी हे ठग किती !


एकदा तेवून बघ तू शांत समईसारखा...
चालली आहे तुझी ही सारखी झगमग किती !


- प्रदीप कुलकर्णी



 

गझल