सडे मुरवुनी आसवांचे, जमीनीतुनी वांझ बीजे खुडू लागले
निघाले जसे गाव शहराकडे, शेत ओसाड सारे रडू लागले
सुखातून दुःखे अशी भेटली की गतीरोधकाहून खड्डे बरे
मिळाली जरी एक आरामगाडी, प्रवासामधे भडभडू लागले
असे पाहिजे नी तसे पाहिजे यात आयुष्य हातातुनी चालले
घडू लागले ते बरे मानल्यावर जसे पाहिजे ते घडू लागले
रिकामाच होतो, सहज काढला आवरायास माळा मनाचा जरा
क्षणार्धात कुलुपे पुन्हा लावली मी, नको ते तिथे सापडू लागले
युगे जाहली पण तुझी पावले आज दारात माझ्या थबकली पहा
कुठे सोडला धीर या चेहऱ्याने, हृदय फक्त हे धडधडू लागले
तसे प्रेम एकाचवेळी उमलले, सरकले पुढे आपले आपले
मला लागली आवडायास ती अन तिलाही कुणी आवडू लागले
असावे इथे औषधाच्याचपुरते असा काढला आज निष्कर्ष मी
सदा या जगाला कडू लागलो मी, सदा जग मला हे कडू लागले
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा