सणासुदीला नटणारा

भूषण कटककर - ⏱ १ मिनिट


क्षणाक्षणाने घटणारा, संधी मिळता कटणारा
जीवन म्हणजे बघत रहा, काळ रंग पालटणारा

माणुसकी सुद्धा येथे, आधारित सोयीवरती
हात जोड वाघाला अन, ठेच किडा सरपटणारा

बारा महिने डोळ्यांना पाझर फुटतो मोत्यांचा
तुझ्यासारखा नाही मी, सणासुदीला नटणारा

'अता सोड की' म्हणताना, घट्ट मला ती बिलगे का?
तिचाच मुद्दा बहुधा तो, तिला नसावा पटणारा

रोज सकाळी आशेची न्याहारी दे मनास मी
कोण इथे दुसरा आहे त्याच्यासाठी झटणारा?

हवा नि माझे युद्ध तसे युगे युगे चालत आले
माझा दर निश्वास असे श्वासावर आपटणारा

देह जाहला जून अता, हात पाय लटपटणारा
पक्षी ह्रुदयाचा अजुनी नको तिथे भरकटणारा

साप सांगतो सापाला, "मनुष्यवस्तीस सोडुया"
"जहरी जात नि फसव्यांचा स्वभाव भुइ धोपटणारा"




गझल